ऊन आणि प्रचार फेरीची गोष्ट…

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचाराचे नियोजन करीत असले तरी घरापासून कार्यरत होईपर्यंत सूर्य तापण्यास सुरुवात झालेली असते. भल्या सकाळी उमेदवार अंगावर खादी चढवून तयार असले तरी त्यांच्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते (रात्रीच्या कामाचा अंमल) सकाळी लवकर पोहोचत नाहीत. कार्यकर्त्यांचा चहा-नाश्‍ता उरकण्यातच वेळ जात असल्याने प्रचार फेऱ्या उशीराच सुरू होत आहेत.

प्रचार फेरी सुरू होतानाच उमेदवाराच्या गळ्यात कार्यकर्ते स्वत:च विकत घेतलेले दोन-चार पुष्पहार घालतात. उमेदवार नटून थटून निघेपर्यंत ऊनं चांगलेच तापलेले असते. संपर्क कार्यालयापासून प्रचार फेरी निघालेली असताना शे-पाचशे कार्यकर्त्यांची संख्या कार्यस्थळी सभेला पोहोचेपर्यंत निम्मी-अर्धी झालेली असते. उमदेवाराची सभेच्या ठिकाणी एंट्री होत असतानाच उगाच ठरल्याप्रमाणे गोंधळ केला जातो. तोपर्यंत अनेक युवा नेत्यांची गर्दी व्यासपीठावर झालेली असते. त्यामुळे उमेदवार बसणार कुठे? अशीही स्थिती अनेकदा निर्माण झाल्याचे चित्र दिसते. माईक टेस्टिंग झाल्यानंतर राजकीय पक्षावर आणि त्यानंतर उमेदवारावर स्तुतीसुमने उधळली जातात. उमेदवार भाषणाला उभा राहीपर्यंत अनेकांनी आपले मन भरभरून मोकळे केले असते. केलेली असतात. तोपर्यंत समोर बसलेल्यांपैकी काही जणही कलटी मारतात.

व्यासपीठावरील काही जणही मागच्या मागे निसटतात. उमेदवाराचे भाषण कसे-बसे उरकल्यानंतर कार्यकर्त्यांना दुपारच्या जेवणाचे वेध लागलेले असतात. एखाद्या कार्यकत्याने मन मोठे करून जेवण ठेवले असेल तर ठीक. नाहीतर सभा आहे त्या भागातच एखादं हॉटेल बघून कार्यकर्त्यांना पोटपुजा उरकून घेण्यास सांगितले जाते. कार्यकर्त्यांच्या पंक्ती उठेपर्यंत दुपारचा चटका वाढलेला असल्याने आणि त्यातच पोटपुजा उरकल्याने कार्यकर्ते थेट संपर्क कार्यालयातील गाद्या गाठत आहेत.

कार्यकर्तेच नसल्याने दुपारच्या प्रचार फेऱ्यांऐवजी घरभेट, चादर बैठकीद्वारे प्रचार केला जात आहे. ऊन उतरल की, चार-पाच वाजता संध्याकाळच्या प्रचार फेरीची गडबड उडते. गाद्या, लोड अस्ताव्यस्त पडलेले असतात. हे सगळं आवरायला वेळ कुणाकडं आहे? त्यामुळे कार्यकर्तेही बाहेर पडलेली चप्पल पायात सरकवत उमेदवार तयार होईपर्यंत गाड्याघोड्यांची तयारी करून ठेवतात. उमेदवार आले की, हिच यंत्रणा पुन्हा एकदा एखाद्या भागाकडे रवाना होत आहे. त्यानंतर ठरलेली सभा, पुन्हा रात्रीची जेवणं आणि रात्रीस खेळ चाले…असा दिनक्रम सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.