पुणे -देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्वसाधारण आणि विद्यापीठाच्या गटातून मानांकन घसरले आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी विद्यापीठ गटात देशात नवव्या क्रमांकावर असलेल्या पुणे विद्यापीठाचे मानांकन 19 स्थानावर गेले आहे.
सर्वसाधारण गटातून पुणे विद्यापीठाचे स्थान गतवर्षीच्या तुलनेत दहा स्थानाने घसरले असून, यंदा 35 वा क्रमांक मिळाला. विद्यापीठाची क्रमवारी घसरत असली तरी राज्यात पारंपरिक विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले स्थान कायम ठेवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क अर्थात “एनआयआरएफ’ रॅंकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते. क्रमवारी जाहीर करताना संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल आणि संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे निकष निश्चित करण्यात आले. त्यावरून दरवर्षी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची क्रमवारी प्रसिद्ध केली जाते.
पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे देशपातळीवर मानांकन घसरणे, ही बाब चिंता करणारी आहे. “एनआयआरएफ’मध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी 58.31 गुण मिळाले आहेत. तर सर्वसाधारण गटात 55.78 गुण आहेत. देशात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मद्रासने क्रमावरीत पहिले स्थान मिळवले आहे. परर्पेक्शनमध्ये विद्यापीठाला फक्त 15.82 गुण आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाला लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करणे मोठे आव्हान आहे.
विद्यापीठाचे मानांकन घसरण्याची कारणे
करोना काळात गुणवत्तेवर झालेला परिणाम
विद्यापीठाचा कारभार “प्रभारी’वरच
परीक्षा नियोजनाचा ढिसाळपणा
रिक्त प्राध्यापकांचा परिणाम
पुरेसे कर्मचारी नसल्याने कामकाजास
फटका