उंब्रज – उद्योजक बनवण्याचे आमिष दाखवून, रोहित राजकुमार कदम (रा. पेरले, ता. कराड) यांची 35 लाख रुपयांची फसवणूक करणारा भामटा अमोल गोविंद शिंदे (रा. वडूज, ता. खटाव) याला उंब्रज पोलिसांनी नवी मुंबईतून एकास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी, रोहित कदम यांच्या घरी त्यांचा मित्र अरुण रावसाहेब माने (रा. बनवडी, ता. कराड), अमोल गोविंद शिंदे (रा. वडूज, ता. खटाव) आणि हर्षद गुलाब इनामदार (रा. अहिरे कॉलनी, कोडोली, ता. सातारा) हे 28 जुलै 2020 ते 6 जानेवारी 2022 या कालावधीत वरचेवर जात होते.
तू बेबी डायपर मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास, तुला फायदा होईल. तू मोठा उद्योजक बनशील आणि आमच्या कंपनीत संचालक मंडळावर तुला घेतो, असे आमिष त्यांनी रोहित कदम यांना दाखवले. रोहित कदम यांनी मित्र अरुण याच्या सांगण्यावरून संशयितांना 35 लाख रुपये दिले. मात्र, त्यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कदम यांच्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित अमोल शिंदे हा फरारी झाला होता. अटक टाळण्यासाठी तो ठिकाणे बदलत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर गोरड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील तपास करीत आहे. सपोनि अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, हवालदार शशिकांत काळे, श्रीधर माने यांनी ही कारवाई केली.