यवतमाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे महिला मेळाव्यासाठी येणार आहे. या कार्यक्रमासाठी यवतमाळनजीक भारी शिवारात येथे भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हे सभामंडपाचे काम सुरू असताना त्यातील एक भाग कोसळल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली.
भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे.
त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली असलेल्या तीन क्रेनवर कोसळले. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून सुदैवाने ते बचावले.
जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आहेत.