नवी दिल्ली – पाक निवडणूक आयोगाने ९ मार्च रोजी अध्यक्षीय निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप सुरू असतानाच अध्यक्षीय निवडणुकांची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांचा ६ वर्षांचा कार्यकाळ ११ मार्च रोजी संपणार आहे. त्याच्या २ दिवस आगोदर अध्यक्षांची निवडणूक घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानमधील ४ प्रांतांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर संसद सदस्यांकडून अध्यक्षांची निवड केली जाणार आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकार्याने सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर पीएमएल-एन पक्षाचे नेते शेहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली ६ पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन केले जाणार आहे, हे निश्चित झाले आहे. अध्यक्ष म्हणून आसिफ अली झरदारी यांना नामनिर्देशित करण्याचा निर्णय देखील झाला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिल्यानंतर झरदारी २००८ ते २०१३ दरम्यान पाकिस्तानचे अध्यक्ष राहिले आहेत.
पाकिस्तानच्या राज्यघटनेतील तरतूदीनुसार विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्याच्या आगोदर ६० दिवस आणि कार्यकाळ संपल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यक्षांची निवडणूक घेतली जाऊ शकत नाही. मात्र संसद विसर्जित केलेली असेल, तर निवडणुका झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या कालावधीमध्ये अध्यक्षीय निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. सार्वत्रिक निवडणुका ८ फेब्रुवारीला झालेल्या असल्यामुळे ९ मार्चला अध्यक्षीय निवडणुका घेतल्या जाणे आवश्यक आहे. त्याच्या दोनच दिवसांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील १०० सदस्य निवृत्त होणार आहेत.
या १०० सदस्यांच्या रिक्त जागांसाठीही मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होणे अपेक्षित आहेत. सार्वत्रिक निवडणुका आणि प्रांतीय निवडणुकांना उशीर झाल्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या या निवडणुकाही एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात घेतल्या जाऊ शकतात.