Mayawati BSP : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे आंबेडकरनगरचे खासदार रितेश पांडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्ष ससोडत असल्याची चर्चा होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, मायावती यांनी यावेळी पक्ष तिकीट कापणार असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यात दिले आहेत.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बसपा खासदार रितेश पांडे यांनी रविवारी पक्ष सोडला. बसपा प्रमुख मायावती यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बऱ्याच दिवसांपासून त्यांना पक्षाच्या बैठकीला बोलावले जात नाही किंवा नेतृत्व पातळीवरून कोणताही संवाद होत नाही. मी तुमच्याशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण काहीही निष्पन्न झाले नाही. पक्षाला आता माझ्या सेवेची गरज नाही. पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या अवघड असला तरी आता दुसरा पर्याय नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत रितेश यांचे वडील माजी खासदार राकेश पांडे यांनी बसपा सोडून सपामध्ये प्रवेश केला होता. ते सपाच्या तिकिटावर जलालपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. या घटनेनंतर बसपा प्रमुख मायावती संतापल्या होत्या. नंतर पांडे यांना पक्षाच्या संसदीय पक्षनेतेपदावरून हटवण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की पांडे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दुरावले. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पांडे यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते.
मायावती संतप्त…
रितेश पांडेने पक्ष सोडण्याच्या निर्णयावर मायावतींनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडे यांचे नाव न घेता त्यांनी लिहिले, तुम्ही बसपचे निकष पूर्ण केले का? तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले आहे का? तुम्ही तुमचा सगळा वेळ समाजासाठी घालवला का? पक्षाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले का? अशा स्थितीत पुन्हा खासदारांना तिकीट देणे शक्य आहे का? अशा परिस्थितीत लोक स्वार्थासाठी इकडे तिकडे भटकताना दिसतील हे स्वाभाविक आहे.