बाधितांचे प्रमाण अजिबात वाढू नये, यासाठी प्रयत्न
पुणे – करोनाबाधित वा मृत्यूचे प्रमाण अधिक असले, तरी बरे होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र, हे प्रमाण अजिबात वाढू नये, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जनजागृतीबरोबरच विविध सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चचवड मिळून जवळपास 75 लाखांपेक्षा अधिक या महानगराची लोकसंख्या आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर म्हणून पुणे हे ओळखले जाते. याठिकाणी नोकरी व कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. लोकसंख्येची घनता जास्त असेल, तर करोना विषाणूची लागण झपाट्याने होत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील महिनाभरापासून विविध आघाड्यावर काम सुरूआहे. हे एकट्याचे काम नाही. तसेच ही आपत्ती नेहमीपेक्षा वेगळी आहे. अशा स्वरूपाचे प्रसंग यापूर्वी कधी आले नव्हते. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. सर्वच यंत्रणा कामाली लागली आहे. याठिकाणी दोन महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या आणि त्या तुलनेत रुग्णालयांची संख्या याचा ताळमेळ बसवावे लागत आहे. पुणे शहरात शासकीय व खासगी मिळून 6 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सर्व अधिष्ठांतांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून इनपुट्स घेतले. खासगी रुग्णालयांबरोबर चांगले काम सुरू आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.