राजगुरूनगर, दि. 23 (प्रतिनिधी) -करोनाच्या हाहाकारात डॉक्टर देवदूत ठरले आहेत. मात्र, याला चांडोली (राजगुरूनगर) ग्रामीण रुग्णालय अपवाद ठरत आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या खुर्चीवर लेखनिक चक्क झोपलेला तर आठ पैकी केवळ एक डॉक्टर येथील रुग्णालयात उपस्थित असल्याचे आढळून आल्याने रुग्णालयाच्या सेवेबाबत उदासीन कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर हजेरी रजिस्टरवर सर्वांची उपस्थिती दाखवून आरोग्य विभागासह नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम येथील डॉक्टर करीत असल्याची बाब आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गुरुवारी (दि. 23) प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन समोर आणली.
आमदार मोहिते यांनी येथील रुग्णालयाला भेट दिली असता येथे विविध आजारांवर उपचारासाठी तालुक्यातून आलेले नागरिक तिष्ठत उभे होते. मुख्य गेट अर्धवट ओढून घेऊन वैद्यकीय अधीक्षकांच्या टेबलावर लेखनिक पाय ठेवून झोपलेला सापडला. शिपाई अन् डॉक्टरांचा पत्ताच नव्हता.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना 24 तासांची सेवा लागू केली असताना आरोग्य सेवेसाठी तत्पर राहण्याची गरज असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयातील ही अवस्था आमदारांच्या निदर्शनास आली. हे चित्र पाहून आमदार मोहिते पाटलांचा पारा चढत, चढत गेला अन् त्यांनी हजेरी रजिस्टर मागितले असता त्यात सर्वच्या सर्व म्हणजे 8 डॉक्टर आणि 33 कर्मचाऱ्यांच्या हजेरी स्वाक्षऱ्या पाहून त्यांचा पारा आणखीनच चढला.
आमदार मोहिते यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर रुग्णालयातील नर्स ,कर्मचारीही येथे जमले. मात्र प्रमुख डॉक्टर नसल्याने कोणालाच नेमकी माहिती देता येईना. शिवाय आमदार मोहितेच्या प्रश्नांचा भडीमार सुरु होताच. बहुतेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. गरज नसताना गोर, गरीब नागरिकाना पुणे, पिंपरी-चिंचवडला जायला सांगितले जाते.
अशा अनेक तक्रारींचा पाढा मोहिते यांनी वाचून उपस्थित एकमेव डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर असे वागणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख यांच्याकडे मोबाइलद्वारे केली. सामाजिक संकट काळात बेजबाबदार व बेशिस्त वागणाऱ्या या डॉक्टरांवर थेट कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
“बाहेर जाऊन पहिले ठरवा काय सांगयचे ते…’
प्रमुख असलेले डॉ. दीपक मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कणकवले आहेत का? असे अमदार मोहितेंनी विचारताच डॉ. मुंडे पुण्याला मिटींगला गेले आहेत असे एकाने सांगितले. एवढ्यात एकमेव उपस्थित असलेले पण जेवायला गेलेले डॉ. रवींद्र नखाते येथे धावतच आले. त्यांनी डॉ. मुंडे आत्ताच जेवायला गेल्याचे सांगितले. यावर पहिले कर्मचारी आणि तुम्ही बाहेर जा, काय बोलायचे ते ठरवा आणि मग मला नक्की सांगा’ असे मोहिते यांनी सुनावले. तसेच डॉ. कणकवले यांच्याकडे चाकण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले गेले.
…म्हणून आमदार मोहिते गेले रुग्णालयात
चांडोली रुग्णालयात बुधवारी (दि. 22) रात्री एक आदिवासी गर्भवती महिला चक्कर येते म्हणून आली. तिच्यावर उपचार करायला एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. यावर आमदार मोहितेंना संपर्क झाल्यावर त्यांनीही याबाबत माहिती घेतली. रुग्णालयात नेमणुकीला असलेले एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी सेवा देणाऱ्या एका शहरातील डॉक्टरला विनंती केली. गर्भाशयात धोकादायक स्थिती झाल्याने या महिलेचा चार महिने झालेला गर्भपात करावा लागला. वेळ गेला असता तर या महिलेच्या जीवाला धोका पोहोचला असता म्हणून आमदार मोहिते यांनी गुरुवारी आवर्जून रुग्णायालात गेले.यावेळी रात्री असलेली स्थिती तशीच होती.
20 मिनिटांचा रस्ता मग एवढा वेळ कसा?
एका रुग्णाला पुढे नेण्यासाठी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेची सकाळी साडेदहा वाजेपासून वाट पाहात असल्याचे नातेवाईकानी सांगितले. यावर रुग्णवाहिका कुठे आहे? असे विचारल्यावर आंबेठाण (चाकण) येथे एका रुग्णाला सोडायला गेल्याचे डॉ. नखाते यांनी सांगितले. आंबेठाण चाकण हद्दीत आहे. चांडोली रुग्णालयाच्या कक्षेत नाही, आणि 20 मिनिटांचा रस्ता असताना एवढा वेळ का लावला? या मोहिते पाटील यांच्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले.