पुणे – करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा सोडल्या, तर सर्वच क्षेत्र बंद आहेत. यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. गेल्या सव्वा महिन्यांपासून अर्थव्यवस्था जळपास पूर्णपणे लॉकडाऊन होती. तर आता हे लॉकडाऊन दि. 17 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला थोडी गती मिळावी म्हणून जिल्ह्यातील चाकण, बारामती, तळेगाव दाभाडे, रांजणगाव एमआयडीसी सोमवार (दि. 4) पासून सुरू करण्यास शासनाने अटी व शर्तींवर हिरवा कंदील दाखवला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी (दि. 3) संपले, तरी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दि. 17 मेपर्यंत करण्यात आले आहे. तर या तिसऱ्या टप्प्यात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक झोनमध्ये नियम तयार केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मॉल, स्विमिंग पूल, चित्रपट गृहे, राजकीय सभा, नाटक, गर्दी जमतील असे सर्व कार्यक्रम घेण्यास कोणत्याही झोनमध्ये परवानी नाही. तर रेड झोनमध्ये लॉकडाऊन आणखी कडक केले जाणार आहे. जरी पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी आर्थिक चाक फिरावे यासाठी औद्योगिक वसाहतीला काही अटी, शर्तींवर परवानगी
दिलेली आहे.
नुकसानीचा आकडा मोठा
सर्वच औद्योगिक वसाहतींतील कंपन्या बंद असल्याने नुकसानीचा आकडा प्रचंड आहे. या संकटातून सावरण्यासाठी सर्वांनाच मोठा कालावधी लागणार हे उघड आहे. या औद्योगिक वसाहतीतील प्रमुख कंपन्यांचा महिन्याचा नुकसानीचा अंदाजे आकडा 50 हजार कोटींइतका प्रचंड आहे. या मोठ्या कंपन्यांचे विजेचे बिलच काही कोटी रुपयांमध्ये असून, पगार व इतर खर्च यांचा विचार करता नुकसान मोठे झाले आहे.
कामगारांना लागली घराची ओढ
लॉकडाऊनमुळे जे आपल्या गावी परतू शकले नाहीत, अशांना अटींवर घरी जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यातच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या 30 टक्के कामगारांवर सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी अनेक कामगार आपल्या गावी इच्छुक असल्याने आता प्रत्यक्षात कामगार कंपनीत येणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. तर नोकरी जाऊ नये म्हणून कर्मचारी कामावर येणार, असेही बोलले जात आहे.
अटी व शर्ती
– 30 टक्के स्थानिक कर्मचाऱ्यांवर उद्योग सुरू करणे
– कंन्टेन्मेंट झोनमधील कर्मचाऱ्यास कंपनीत येण्यास परवानगी नाही
– सोशल डिस्टंन्सिगचे काटेकोरपणे पालन करणे
– रात्री 7 ते सकाळी 7 यावेळेत कामास बंदी
– चाकण, बारामती तळेगाव दाभाडे, रांजणगाव एमआयडीसी अटी, शर्तींसह सुरू