लंडन – गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडनेच विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी सर्व खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले होते. मात्र, नवीन घर घेतल्याने तिथे सर्व सामान हलविताना पदक सापडत नसल्याने चिंतेत असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा अर्चरने अखेर पदक मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
हे पदक माझ्यासाठी खास आहे. कारकीर्दीतील पहिलीच विश्वकरंडक स्पर्धा खेळताना संघ जिंकला याचे मला महत्त्व आहे. या स्पर्धेतील सरस कामगिरीमुळे संघातील सर्वांनाच पदक बहाल करण्यात आले होते.
नवे घर घेतल्यानंतर सर्व साहित्य व सामान हलविताना हे पदक कुठेतरी ठेवले गेले. मात्र, आता पदक सापडल्याने खूप आनंद झाला आहे, असे आर्चरने सांगितले. गेल्या वर्षी इंग्लंडला विजेतेपद मिळाले. या स्पर्धेत आर्चरने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. नवोदित वेगवान गोलंदाज असूनही त्याने कायमच फलंदाजांवर वर्चस्व गाजविले होते.