बारामती (प्रतिनिधी) – शहरात कोरोनच्या संकटावर मात करण्यासाठी लढा देत असलेल्या 500 पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दोन वेळच्या भोजनाची सोय येथील श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन देवस्थानच्या वतीने केली जात आहे. गेले दीड महिन्यांपासून देवस्थानच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत इतरांना मार्गदर्शक ठरत असलेल्या या उपक्रमाचे बारामतीत सर्वत्र कौतुक होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. भिलवाडा तसेच बारामती पॅटर्ननुसार बारामतीत देखील लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. करोना या विषाणूजन्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. बारामतीचे नागरिक घरात सुरक्षित राहावेत यासाठी शासकीय व पोलीस प्रशासनातील अधिकारी-रस्त्यावर उभे आहेत .बारामतीकरांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन देवस्थानच्या वतीने केली जात आहे. या उपक्रमास सहकार्य करत बारामती इंडस्ट्रीज प्रा. लि. चे संचालक सचिन उर्फ निलेश कुलकर्णी यांनी येथे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली आहे.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील उपहारगृहात जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री दिगंबर जैन समाजाच्या आर्थिक व धन्यच्या स्वरुपातील मदतीने गेले दीड महिना हा उपक्रम बारामतीत राबविला जात आहे. इथून पुढील काळातही लॉकडाऊन संपेपर्यंत बारामतीकरांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभे असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही भोजन सेवा देण्यात येणार असल्याचे श्री दिगंबर जैन पंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पुष्पवृष्टी करून व्यक्त केली कृतज्ञता
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.