खंडाळा -पारगांव (ता. खंडाळा) या ठिकाणी महामार्गनजिक पत्रा शेडचे काम सुरू असताना फॅब्रिकेशन व्यावसायिकाच्या उपकरणांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली.
याबाबत खंडाळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अजय हिंदुराव बरकडे (रा. धावडवाडी, ता. खंडाळा) यांचे पारगांव या ठिकाणी महामार्गानजिक पत्रा शेडचे काम सुरू होते. यावेळी बरकडे हे दि. 9 रोजी काम करून घरी गेल्यानंतर दि. 10 रोजी सकाळी कामावर गेले असता त्यांचे वेल्डिंग कामाची उपकरणे चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमध्ये 33 हजारांची वेल्डींग मशिन, आठ हजार रुपयांचा ब्ररेकर, दोन हजार 800 रुपयांची ग्राइंडर मशीन, चार हजारांचे हॅमर मशीन, पाच हजार दोनशे रुपयांचे ड्रिल मशीन, तीन हजार रुपयांचे चार्जिंग किट आणि 12 हजार रुपयांचे मशीनचे बीट, छन्नी, वायरिंग इत्यादी असे एकूण 68 हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले आहे. याबाबत अजय बरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पांडुरंग हजारे अधिक तपास करत आहेत.