फलटण – पाणी, रेल्वे, एमआयडीसी, रस्ते आदी केलेली मोठी विकासकामे पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वास फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
माढा लोकसभा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचंड रॅलीत ते बोलत होते. रॅलीचा शुभारंभ शुक्रवार पेठेतील रामेश्वर महागणपती मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, सौ. मनीषा नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, अनुप शहा, सचिन अहिवळे, फिरोज आतार, आबा बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समशेरबहाद्दर म्हणाले, फलटण तालुका आणि माढा लोकसभा मतदारसंघात पाणी, रेल्वे, एमआयडीसी, रस्ते आदींचा प्रचंड प्रमाणात विकास केल्याने, सर्वसामान्य जनता रणजितसिंह यांना पुन्हा आशीर्वाद देईल. फलटणसह लोकसभा मतदारसंघाचा आणखी विकास करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या कर्तृत्ववान उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. दिल्लीच्या तख्तावर फलटणचा सुपुत्र पुन्हा विराजमान होईल, यासाठी सर्वांनी गटतट न पाहता मतदान करावे.
रॅलीमध्ये माजी नगरसेवक झाकीर मणेर, अण्णा घाडगे, अमरसिंह नाईक निंबाळकर, अमोल सस्ते, संदीप चोरमले, संजय चिटणीस, डॉ. प्रवीण आगवणे, मेहबुब मेटकरी, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष उषा राऊत, डॉ. श्रीवास्तव, सूर्यकांत दोशी, भाजप व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, गजानन चौक, मारवाड पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली.