फलटण – पोलिसांच्या आशिर्वादाने, संगनमतानेच फलटण शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्वरीत कारवाई करावी, असे प्रतिपादन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी संचालक निलेश कापसे आणि शंभूराज पाटील उपस्थित होते. रघुनाथराजे पुढे म्हणाले, फलटणमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, चक्री, जुगार सुरु असून या सर्व अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ आहे. यामुळे अनेक कुटुंबे भरडली जात असून, सातारा जिल्ह्याला लाभलेल्या समीर शेख यांच्यासारख्या तरुण तडफदार पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून, या प्रकरणातील संबधितांवर कारवाई करावी.
फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्याकडून तक्रारदारांनाच शिवीगाळ होत असल्याचे अनेकांनी आपणास सांगितले आहे.
फलटण शहराच्या परिसरात वेश्या व्यवसायही मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे सुरु असून, ऐतिहासिक, सुसंस्कृत अशा फलटण शहरातील तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप पोलिसांनी आपल्या माथी घेऊ नये. याबाबत श्री. शेख यांनी तातडीने पावले उचलावीत. फलटण शहरातील बाजारपेठेत व्यापारी आणि बाजारकरुंना परप्रांतीय तृतिय पंथियांचा त्रास होत असून, त्याबाबतही पोलीस आणि पालिकेने कारवाई करावी, अशी अपेक्षा रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.