नगर -नगर शहरातील बहुतेक मार्गांवरील पथदिवे बंद आहेत. महापालिकेत पथदिवे व दुरस्तीचे साहित्य नसल्याने अनेक भागांत रात्री अंधार असतो. मात्र, आता दिवाळीपूर्वी हा अंधार दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या सभेत आज पथदिवे खरेदी व दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
सभापती मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची ऑनलाइन सभा झाली. समितीचे सदस्य नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, विद्युत विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे आदींसह अधिकारी व कर्मचारी सभेला उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्टोअर विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार पथदिव्यांच्या साहित्याची खरेदी केली जाणार आहे.