नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने खुल्या जागेवर (ओपन स्पेस) बांधलेल्या नियमबाह्य व्यापारी संकुलातील 30 गाळे पाडण्यासाठी नगर शहर शिवसेनेने महापालिका प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम आज दिला. न्यायालयाने आदेश देवूनही बाजार समितीने बांधलेले नियमबाह्य गाळे अजूनही शाबूत असल्याच्या मुद्यावर शिवसेना व नगर तालुका विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची कोंडी केली.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित नियमबाह्य गाळेप्रश्नी आज नगर शहर शिवसेना व नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, महाविकास आघाडीचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस केशव बेरड यांच्या सहीने गाळ्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, गणेश कवडे, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
बाजार समितीच्या आवारातील कथित बेकायदा गाळे पाडून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनी 30 जुलै 2018 रोजीच बाजार समितीला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला. तथापि, न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो रखडला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत ही कारवाई रखडली होती. आता ही कारवाई पूर्ण करण्यास काहीच हरकत नसल्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी मांडली.