पालिकेचे 48 कर्मचारी करोनाबाधित; 5 जणांचा मृत्यू
पोलीस दलातील 22 जण करोनाबाधित; 2 जणांचा मृत्यू
पुणे – गेल्या 58 दिवसांपासून शिलेदारी बाण्याने लढल्याचे फोटो काढून सोशल मीडिया व्यापून टाकणाऱ्या राजकारण्यांनी आता एकमेकांवरील आरोपांच्या तोफा बाहेर काढल्या आहेत. “कुणी काय केले’ याचे पाढे वाचत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला आता राजकारण्यांनी सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेच्या तब्बल 48 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहर पोलीस दलातील 22 कर्मचारी बाधित झाले असून, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे शहरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये करोनाच्या उपाययोजनांतील यश अपयशावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना प्रशासनाची करोना विरोधातील लढाईची धार बोथट केली जात असल्याने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या कार्यात असलेल्या कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. सफाई कर्मचारी, शिपाई, बिगारी, लिपिक, बहुद्देशीय कामगार, आरोग्य निरीक्षक, वाहन चालक, बालवाडी शिक्षिका आणि नर्सेसचा यात समावेश आहे. यापैकी 37 कर्मचारी हे महापालिकेच्या कायम सेवेतील असून, 11 कर्मचारी कंत्राटी आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 5 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी 4 सफाई कर्मचारी असून एक आया आहे. उर्वरित 43 कर्मचाऱ्यांपैकी 24 कर्मचारी बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 19 जणांवर उपचार सुरू आहेत.
सध्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. सध्याची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका विरोधी पक्ष आणि महापालिकेतील सत्ताधारीही ठेवू लागले आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली…
सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सुविधा निर्माण करण्यापासून अगदी क्वारंटाइन केलेल्या हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था जीव ओतून करत आहेत. मात्र, प्रत्येक भागातून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा तसेच राजकीय कार्यकर्त्यांचा दबाव झेलावा लागत आहे. एवढे करूनही आरोप होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांमधील नाराजी वाढू लागली आहे. काही कर्मचाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीची खंत व्यक्त केली.