अनुष्काची वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. अनुष्काची पहिली बहुचर्चित वेब सीरिज “पाताललोक’ नुकतीच रिलीज झाली आहे. या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या वेबसीरिजच्या कथेची आणि त्यातील भूमिकांची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण आता ही वेबसीरिज वादात सापडली आहे. लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेब सीरिजमुळे निर्माती अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे.

अनुष्का शर्माला 18 मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीरेन म्हणाले, त्यांना नेपाळी शब्द या वेबसीरिजमध्ये वापरल्याबद्दल कोणतीही समस्या नाही. पण त्यानंतर जो शब्द वापरला गेला आहे, त्याला त्यांचा विरोध आहे.

या शब्दांमुळे नेपाळी समाजाचा अपमान झाल्याचे वीरेन यांचे म्हणणे असून यासाठी अनुष्काने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, “पाताललोक’मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वेब सीरीजचे लेखन सुदीप शर्माने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.