सातारा – अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसील कार्यालयात जप्त केलेला डंपर सोडवण्यासाठी व आकारलेला दंड कमी करण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना वाई तहसील कार्यालयातील राजू माणिकराव शेडमाके (वय 33 रा. धोम कॉलनी, सोनगिरवाडी, ता. वाई. मुळ रा. नांदेड) या लिपिकास लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदाराचा वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्यांचा डंपर महसूल विभागाने केलेल्या कारवाईत जप्त करून वाई तहसील कार्यालयात लावला होता. त्या डंपरचा दंड कमी करून, सोडून देण्याकरीता वाई तहसील कार्यालयातील लिपिक राजू शेडमाके याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने दि. 17 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील (एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, वैभव गोसावी, सुप्रिया कादबाने, प्रशांत वाळके यांनी वाई तहसील कार्यालयासमोर सापळा लावला होता. त्यात शेडमाके तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी शेडमाके याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.