शासकीय कामात अडथळा; उपमुख्याधिकाऱ्यांची तक्रार
सातारा – पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत आपण दिलेले विषय का घेतले नाहीत, असे विचारणा करत उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळला आणल्याप्रकरणी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदार यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगरसेवक बाळू खंदारे यांनी दि. 13 रोजी पाण्याची बादली घेऊन उपमुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला. टेबलावर बादली ठेवून, “तुमच्या केबिनमध्ये प्रातर्विधी करणार आहे,’ असे म्हणत पॅंट उतरवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मी सुचवलेले विषय सभेच्या विषयपत्रिकेत का घेतले नाहीत, असे म्हणत खंदारे यांनी गोंधळ घातला होता. त्यांना टेबलावरून खाली उतरायला सांगितले असता, धुमाळ यांचा हात झटकून धक्काबुक्की केली. शिपाई देवानंद दळवी यांनीही खंदारेंना समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांनाही दमदाटी करून खंदारे यांनी त्यांच्याकडून बादली हिसकावून पुन्हा टेबलावर ठेवली. खंदारे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर असभ्या वर्तन करून शासकीय कामात अडथळा आणला. खंदारे यांनी यापूर्वीही एका महिला कर्मचाऱ्याबरोबरही उद्धट वर्तन केले होते; परंतु भीतीमुळे संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. खंदारे पालिकेतील कर्मचाऱ्यांशी वारंवार हुज्जत घालतात. दमदाटी करून दहशत निर्माण करतात, असेही संचित धुमाळ (वय 32, रा. केसरकर पेठ, सातारा, मूळ रा. जोगवडी, ता. भोर, जि. पुणे) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.