पिंपरी-चिंचवड शहर सर्वांसाठी खुले

लॉकडाऊनचे नियम शिथिल; राज्य शासनाच्या आदेशाची होणार अंमलबजावणी


केवळ कंटेन्मेंटमध्ये निर्बंध लागू; पालिका आयुक्‍तांचे आदेश जारी

पिंपरी – लॉकडाऊनमुळे थांबलेले शहर आजपासून खुले झाले. पीएमपीएमएलसह सर्वच्या सर्व आस्थापना सुरू करण्यास मोकळीक देण्यात आली आहे. 26 मे पासून आसन क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवाशांची वाहतूक पीएमपीएमएलमधून करता येणार आहे. केवळ कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये निर्बंध लागू राहणार आहेत. धार्मिक स्थळांसह शाळा, महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रशिक्षण संस्था, शिकवणी, सिनेमा हॉल बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. 21) रात्री उशीरा जारी केले.

19 मे रोजी राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळले होते. त्याच दिवशी राज्य शासनाने अनेक बाबींमध्ये शिथिलता जाहीर केली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून शहरातील वाढणाऱ्या रुग्णांमुळे आढावा घेतल्यानंतरच निर्बंध आणि शिथिलतेबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर करू, अशी भूमिका महापालिका आयुक्त श्रावण यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आज त्यांनी शहरातील एकूणच परिस्थितीबाबत निर्णय जाहीर केले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील बहुतांश आस्थापना, दुकाने, कंपन्या खुल्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुरुवारी रात्री आयुक्तांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, शहरातील नागरिकांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय विमान प्रवास करता येणार नाही. मेट्रो, रेल्वे प्रवासाला देखील प्रतिबंध असणार आहे. लॉकडाऊनमुळे तसेच संभाव्य गर्दी व धोके लक्षात घेऊन यापुढेही शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लासेस, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. वैद्यकीय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, अलगीकरण केंद्र आदी ठिकाणी उपहारगृह चालू राहतील. तसेच, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा-संमेलने, धार्मिक कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

65 वर्षांपुढील व्यक्तींना व दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना तसेच अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. कंटेन्मेंट क्षेत्रातील व्यक्तींना संबंधित क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी अथवा बाहेरील व्यक्तींना त्या ठिकाणी जाण्यासाठी व वाहतुकीसाठी प्रतिबंध असणार आहे.

मात्र कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सर्व प्रकारच्या आस्थापने सुरू करण्यास या आदेशाने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही. सर्व कंपन्यांना आता पूर्ण क्षमतेने व पूर्ण मनुष्यबळासह (शंभर टक्के कर्मचारी) काम करता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाचा आरोग्य सेतू ऍप आणि महापालिकेचा सारथी ऍप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपनीमध्ये येणारे काही कर्मचारी जर रेडझोन क्षेत्रातून कामावर येणार असतील तर त्यांना कामावर येण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असणार आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांनाही परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवर एक व्यक्ती, तीनचाकीमध्ये चालक व इतर दोन व्यक्ती तर, चारचाकी वाहनांमध्ये चालकासह तीन व्यक्तींना प्रवास करता येणार आहे.

मुख्य बाजारपेठांसाठी सम व विषम तारखा
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य सर्व दुकाने आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत. मुख्य बाजारपेठांमधील दुकाने मात्र सम व विषम तारखेला उघडी ठेवता येतील. त्यामुळे करोनाला प्रतिबंध घालता येणे शक्‍य होणार आहे. सम आणि विषम पद्धतीचा अवलंब चिंचवडस्टेशन, पिंपरी कॅम्प, साई चौक आणि शगुन चौक परिसर (पिंपरी), गांधी पेठ व चापेकर चौक (चिंचवडगाव), काळेवाडीचा मुख्य रस्ता (एम.एम.स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल), मोशी चौक, मोशी-आळंदी रस्ता, महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप, डांगे चौक ते काळेवाडी फाटा, भोसरी-आळंदी रस्ता, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक, दिघी जकातनाका ते मॅगझीन चौक – साईबाबा मंदिर आदी ठिकाणी सम आणि विषम तारखेचा अवलंब करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवेची दुकाने पूर्वीप्रमाणेच 10 ते दुपारी 12 या वेळेत खुली राहणार आहे. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत.

पीएमपीही सुरू होणार
शहरातील 22 मार्चपासून थांबलेली पीएमपीची सार्वजनिक वाहतूक सेवाही खुली करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. मंगळवारपासून (दि. 26) आसन क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवाशांची वाहतूक पीएमपीएमएलमधून करता येणार आहे. प्रवाशांनी सामाजिक अंतर राखून प्रवास करावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.

क्रीडा संकुले नागरिकांसाठी खुली
लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने बंद असलेली क्रीडा संकुले, स्टेडियम आणि खुली सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी आजपासून खुली केली आहे. या ठिकाणी वैयक्‍तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळण्याचे खेळ, योगासने, दोरीवरच्या उड्या आदींना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियममध्ये एकत्र येऊन खेळण्याच्या क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉलसारख्या खेळांना मात्र यापुढेही बंदी कायम राहणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×