कर्जत -गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचे कडक नियम पाळणाऱ्या कर्जत तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. मुलीकडे आलेल्या मुळ मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा राशीन येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असतांना करोनाने मृत्यू झाला. त्यानंतर कर्जतचे प्रशासन सतर्क झाले आहे. आज तहसीलदार सी. एम. वाघ यांनी राशीन येथे येवून परिस्थितीचा आढावा घेतला.
करोनाबाधित महिलेने वास्तव्य केलेला परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. दरम्यान, त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती पोलीस व आरोग्य विभागाकडून घेत बारा जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे. कंटेन्मेंट झोन करणेबाबत आरोग्य विभागाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार सी. एम. वाघ यांनी राशीन येथे दिली.
राशीन येथील सुमारे 2300 कुटुंबे असून आरोग्य विभागाकडून 100 कुटुंबासाठी एक या पद्धतीने 22 पथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स हे घरोघरी जाऊन याबाबत सर्वेक्षण करीत आहेत. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तपासणी करण्यासाठी नगरला पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे तहसीलदार यावेळी म्हणाले. ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत भीमराव साळवे, उपसरपंच शंकर देशमुख यांच्यासह करोना समितीचे सदस्य व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनीही राशीन येथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटींचे ग्रामस्थांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपसरपंच शंकर देशमुख तसेच भीमराव साळवे यांनी केले आहे.