जावली तालुक्यातील आनेवाडी येथील घटना
आनेवाडी – पतीकडून दारू पिऊन वारंवार होत असलेल्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या पत्नीनेच पतीचा डोक्यात फरशी व वरवंटा घालून खून केला आहे. ही घटना जावली तालुक्यातील आनेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री घडली.
आनेवाडी, ता. जावली येथे आपल्या सासरवाडीमध्ये राहणारे संजय विष्णू कांबळे (वय 45, मुळगाव वाकुर्डे, जि. सांगली) हे आपली पत्नी सुलोचना (वय 35) व तीन मुली सायली, पूर्वा, श्रुती व एक मुलगा राहुल यांच्यासह राहत होते.
संजय हा वाई येथे एका इलेक्ट्रिकलच्या दुकानात मोटर वायडिंगची कामे करीत असत, कामावरुन येतानाच तो दारू पिऊन येत असे व घरी पत्नी सोबत भांडण करत. यामुळेच पत्नी सुलोचना या मानसिक जाचामुळे मानसिक रोगी झाल्या होत्या. वारंवार सुरू असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या सुलोचना यांचे सोमवारीही पतीसोबत जोरादार भांडण झाले. यावेळी त्यांनी फरशी व वरवंटयाच्या सह्याने पतीच्या डोक्यात व पायावर वार करीत खून केला.
सोमवारी रात्री सुलोचना व चार ही लहान मुले उपाशी पोटी झोपली होती. गरिब परिस्थितीमुळे सुलोचना यांच्या कुटुंबावर अशी वेळ वारंवार येत होती. पैसा नसल्याने मुलानी शाळेची पायरीदेखील कधी चढलेली नाही. आता संजय आणि सुलोचना यांच्यानंतर या मुलांचे काय? या प्रश्नाने परिसरात ग्रामस्थ हळ हळ व्यक्त करीत होत आहे. सकाळी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामबुवा, पोलिस उपनिरीक्षक अमृता रजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली व सातारा येथून श्वान पथक बोलावून पुढील तपास सुरु केल्याने श्वान पथकाच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणला.