मंत्र्यांसमोरच महायुतीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ

संगमनेर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून होत असलेली बंडखोरी आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे मतदारसंघात न फिरकल्याच्या कारणावरुन संगमनेरमध्ये झालेल्या महायुतीच्या नियोजन बैठकीत आज गोंधळ उडाला. या गोंधळातच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि शिर्डीचे लोकसभा संपर्कप्रमुख नरेंद्र दराडे यांनी युतीच्या उमेदवारांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

राज्यमंत्री भुसे, संपर्कप्रमुख दराडे आणि शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे, भाजप युवा मोर्चाचे सचिन तांबे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये भाजप-सेना आणि महायुतीतील समविचारी पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नियोजनाची बैठक बोलावण्यात आली होती. शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अप्पा केसेकर, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, ऍड. दिलीप साळगट, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, नव्यानेच शिवसेनेत प्रवेश केलेले जयवंत पवार, शरद थोरात, भाजपचे तालुकाप्रमुख काशिनाथ पावसे, शहरप्रमुख राजेंद्र सांगळे, नगरसेविका मेधा भगत, डॉ. अशोक इथापे, भरत फटांगरे आदी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत कार्यकर्त्यांनी बोलण्याचा आग्रह धरला. मात्र कार्यकर्त्यांना बोलू न देता उपस्थितांनी आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. यावर ही नियोजनाची पाचवी बैठक आहे. भाषणापेक्षा नियोजनावर भर द्या, असे कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुनावले. दरम्यान, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी शिर्डीचा उमेदवार बदलणार असल्याचा मेसेज व्हॉट्‌स ऍपवर फिरत आहे. खासदार कधी मतदारसंघात फिरकले नाहीत, असे लोक आम्हाला विचारतात, आम्ही काय उत्तरे द्यायची, असा सवाल करत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र दराडे यांनी त्यांच्या हातातून माईकचा ताबा घेत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाराज झालेले सातपुते तेथून निघून गेले. काही वेळानंतर ते पुन्हा सभागृहात आले.

शिवसेनेचे गुलाब भोसले यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष उमेदवारी दाखल करत आहेत, भाजपशी बंडखोरी करुन ते उमेदवारी करत असल्याने त्यांच्यावर पक्षाने काय कारवाई केली, असा सवाल केला. आम्हाला महायुतीचा धर्म पाळण्यास सांगतात. मग त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. यावर सचिन तांबे यांनी त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्ष कारवाई करेल, असे सांगितले. एकूणच बैठकीत लोखंडे यांच्यावर नाराजीचा सूर अनेकांनी आवळळा. त्यामुळे मंत्री भुसे, संपर्कप्रमुख दराडे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु होता. दराडे, तांबे आणि उमेदवार लोखंडे यांची भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.