भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली; अजित पवारांचा टोला

भिंगरी लावल्यासारखे कामाला लागा; कार्यकर्त्यांना सूचना

पुणे – भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. ते जे काही सांगतील त्यावर विश्‍वास ठेवू नका. पायाला भिंगरी लावल्यासारखे कामाला लागू या, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी कॉंग्रेस भवन येथील सभेत केल्या.

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, हर्षवर्धन पाटील आणि अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

चारही मतदार संघात काम करताना एकमेकांच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान द्या. जेथे अडचण येईल तेथे सोडवण्याचा प्रयत्न करा. नाहीच झाले तर मला आणि हर्षवर्धन पाटील यांना सांगा. कोणताही कार्यकर्ता रुसणार, फुगणार नाही हे पहा, अशा सूचनाही शहराध्यक्षांना आणि प्रमुखांना पवारांनी दिल्या.

विधानसभेच्या जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. अशावेळी त्याचे गणितही मांडले जाते. मात्र, त्याचा निर्णय कॉंग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार हे घेणार आहेत. त्यांचा निर्णय आपल्याला मान्य आहे. त्यामुळे काळजी करू नका, कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही पवारांनी दिली.

स्मार्ट सिटी, मेकइन इंडियाने पुण्याला काही दिले नाही, हे समाजापर्यंत पोहोचवा. ऊन वाढणार आहे. परंतु कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्साह आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. तीन आठवडे झोकून देऊन कामाला लागा, असेही पवार म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी दोन लाख लोक सभेला होते, आता उन्हामुळे 35 हजारच जमा झाले असे ऐकावे लागले, असे बोलून वर्धा येथील पंतप्रधान मोदींच्या सभेला मिळालेल्या अल्प प्रतिसादावर पवारांनी टीका केली. पण हवा बदलत आहे, असेही ते म्हणाले.

बुथ चांगला ठेवा. मतदान वाढवा आम्ही ते पाहणार आहे. कारण नसताना रंगाचा बेरंग करू नका. अनुभवाच्या शिदोरीतून काळजी घ्या. सोशल मीडियाचा वापर करा, असाही सल्ला पवारांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.