मे अखेर रुग्णसंख्या 10 हजारांवर जाण्याचा अंदाज
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल आवारात तब्बल 10 हजार खाटांची क्षमता असलेले रुग्णालय उभारले जाणार आहे. पुढील दहा दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून ही उपाययोजना केली जात आहे.
शहरातील करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही महापालिकांना सोयीस्कर अशी ही मध्यवर्ती जागा असल्याने येथे हे रुग्णालय उभारले जाणार आहे. पुणे शहरातील करोनाबाधितांची संख्या अडीच हजारांवर गेली आहे. करोनाचे रोजचे वाढणारे रुग्ण, त्यांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आणि ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे पुढील काही आठवडे शहरात रुग्णसंख्या वाढणार आहे.
सध्या शहरात पालिकेने उपचारासाठी केलेल्या सुविधेवर या रुग्णवाढीमुळे ताण येणार आहे. तर रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन 30 मेपर्यंत ही संख्या 10 हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासूनच हे रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, पालिकेच्या अभियंत्यांनी या ठिकाणी असलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील वेगवेगळ्या हॉलची पाहणी आणि मोजणी केली आहे. या कामासाठी साखर आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक
या तात्पुरत्या हॉस्पिटलसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग महापालिकेकडे नसल्याने राज्यशासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांची या भागात नेमणूक करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. तर पालिकेकडून सुमारे 200 रिक्त डॉक्टरांच्या पदांची भरती सुरू आहे. यात निवड झालेल्या डॉक्टरांना तीन महिन्यांची नियुक्ती देण्यात येणार असून, हे डॉक्टर या तात्पुत्या दवाखान्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत. नंतर त्यांच्या पुढील नियुक्तीला मुख्यसभेची मान्यता घेतली आहे.