इस्लामाबाद – पाकिस्तानच्या अधिकृत माध्यमांनी आता जम्मू काश्मीर मधील हवामानाचाही अंदाज वर्तवणे सुरू केले आहे. हा भाग पाकिस्तानचाच असल्याचे भासवण्याचा त्यांचा हा प्रयत्न मानला जात आहे. शनिवारी पाक रेडिओने जम्मू आणि काश्मीरात हवामान अंशत: ढगाळ राहील आणि तेथे पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यांनी श्रीनगर, पुलवामा, जम्मू आणि लडाख या शहरांचे कमाल आणि किमान तापमानही सांगायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानी टीव्हीवर आता काश्मीरची स्पेशल बुलेटिन्सही प्रकाशित होऊ लागली आहेत.
भारतीय माध्यमांनी पाक व्याप्त काश्मीरमधील हवामानाचा अंदाज वर्तवणे सुरू केल्यानंतर पाकिस्ताननेही हे उपदव्याप सुरू केले आहेत. भारताने नोव्हेंबर मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या नकाशात पाकिस्तान व्याप्त काश्मीरचाही भाग दाखवल्याने पाकचे माथे ठणकले आहे.