पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच पोलीस ठाण्यांचे टेलिफोन बंद आहेत. तर तीन पोलीस ठाण्यांमधील एक नंबर सुरू तर दुसरा बंद अशी परिस्थिती आहे. सात पोलीस ठाण्यातील लॅंडलाइन नंबर सुरू आहेत.
नागरिकांना पोलिसांशी तात्काळ थेट संपर्क साधता यावा, पोलीस मदत मागता यावी यासाठी लॅंडलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोशल मीडिया, मोबाइल आदी साधनांचा वापर वाढल्याने लॅंडलाइन क्रमांकावरील ताण काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र नवीन साधनांवर प्रतिसाद मिळेल याची खात्री नागरिकांना नसल्याने नागरिक लॅंडलाइन क्रमांकावरच संपर्क करण्यासाठी प्राधान्य देतात.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सर्व पोलीस ठाण्याच्या लॅंडलाइन नंबरपैकी पिंपरी, तळेगाव एमआयडीसी, सांगवी, दिघी, आळंदी या पोलीस ठाण्याचे क्रमांक बंद आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहननगर, संत तुकाराम नगर आणि पिंपरी या तीन चौक्यांचे नंबर दिले असून ते तीनही नंबर बंद आहेत. तर निगडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वाकड, एमआयडीसी भोसरी, चाकण, चिखली या पोलीस ठाण्याचे लॅंडलाईन नंबर सुरू आहेत. चिंचवड, हिंजवडी आणि भोसरी पोलीस ठाण्याचे दोन क्रमांक देण्यात आले आहेत. त्यातील एक क्रमांक सुरू असून एक क्रमांक बंद आहे.
संकेतस्थळावर अपडेट नाही
लॅंडलाइन क्रमांक बंद असलेल्या पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक सुरू करण्यात आला आहे. त्यावरून नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत. मात्र ते नवीन मोबाइल क्रमांक आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात
आलेले नाहीत.
तुम्हाला नंबर कुठून मिळाला
लॅंडलाइन क्रमांक सुरू नसल्याने कुठूनतरी ठाणे अंमलदारांचा नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क केल्यास फोनवरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याअगोदर पोलिसांचा प्रश्न असतो कि, तुम्हाला नंबर कुठून मिळाला. सगळी उकल करून सांगितल्यानंतर मग पुढे संवाद सुरू होतो. असे अनेक तक्रारदारांच्या बाबतीत घडले आहे.
बिल थकल्याने कनेक्शन कट?
काही पोलीस ठाण्यातील लॅंडलाइनचे बिल थकल्याने टेलिफोन कंपनीकडून कनेक्शन कट केले असल्याचे पोलीस खासगीत बोलतात. आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून लॅंडलाइन आणि इंटरनेटच्या अडचणी वारंवार येत आहेत. अनेकदा अधिकाऱ्यांना स्वखर्चाने इंटरनेट डोंगल आणून काम करावे लागलेले आहे. पोलीस आयुक्त कार्यालय चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे स्थलांतरित झाल्यानंतर बीएसएनएलचे बिल थकल्याने कंपनीकडून चक्क पोलीस आयुक्तालयातील फोन, इंटरनेट कनेक्शन कट करण्यात आले होते.