पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. शनिवारपासून विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांतील अध्यापन बंद राहणार आहे. मात्र, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील प्रशासकीय व नियमित कामकाज सुरू आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नसेल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, त्यांनी अनावश्यक फिरू नयेत, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांनी द्याव्यात. जे विद्यार्थी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहात असतील, त्यांनाही अनावश्यक न फिरण्याचे सूचना द्याव्यात. कोणी अनावश्यक फिरताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कार्यवाही होईल, याची जाणीव करून द्यावी, असा सूचना विद्यापीठाने सर्व विभागप्रमुख, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.
सकाळी व सायंकाळी विद्यापीठात फिरण्यास मनाई
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पूर्वपरवानगीशिवाय आजपासून प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सकाळी व सायंकाळी फिरावयास येण्याची सुविधाही खंडित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या सर्व प्रवेशद्वारातून केवळ विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्यापीठातील रहिवासी यांनाही ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाईल. विद्यापीठ प्रवेशद्वारावरील बायोमेट्रिक व्यवस्था या कालावधीत बंद राहणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
पुणे विद्यापीठाच्या व विभागाच्या इतर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. वसतिगृहात अथवा वाचनासाठी बाहेर निघताना परीक्षार्थ्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट सोबत बाळगावे व आवश्यक असेल तेथे दाखवावे. परीक्षेबाबत शासनाचे काही सूचना प्राप्त झाल्यास तसे विद्यार्थ्यांना कळविले जाईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
या सुविधा बंद राहणार
– जयकर ग्रंथालय व अन्य वाचनकक्ष
– कमवा व शिका योजना
– व्यायामशाळा
– उपवने व उद्याने
– सर्व क्रीडा सुविधा
– अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनसेवा
– अभ्यागत निवास
– पाळणाघर