नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याशी जाहीर चर्चा करण्यास राजी होणार नाहीत. कारण, ते उद्योगपती अदानी आणि निवडणूक रोख्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाहीत, अशी शाब्दिक टोलेबाजी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर चर्चेचा प्रस्ताव काही नामवंत व्यक्तींनी मोदी आणि राहुल यांच्यापुढे ठेवला होता.
त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी दिल्लीतील कॉंग्रेसच्या सभेत मोदींना लक्ष्य केले. काही पसंतीच्या पत्रकारांना मोदी मुलाखती देत आहेत. पण, माझी तयारी असूनही ते माझ्याशी जाहीर चर्चा करणार नाहीत. तशी चर्चा झालीच तर अदानींशी तुमचे काय संबंध आहेत असा पहिला प्रश्न मी विचारेन.
दुसरा प्रश्न मी निवडणूक रोख्यांविषयी विचारेन. केवळ त्या दोन प्रश्नांवरच चर्चा संपेल, अशी तिरकस टिप्पणी त्यांनी केली. दिल्लीत कॉंग्रेस आणि आपने हातमिळवणी केली आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
आताच्या निवडणुकीत मी आपला मतदान करणार आहे. तर, त्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल कॉंग्रेसला मतदान करतील. ती बाब लक्षणीय आहे, अशी पुस्तीही राहुल यांनी जोडली.