नगर -युवक कॉंग्रेस आणि एनएसयूआयच्या तालुकास्तरीय समन्वयकांच्या नियुक्त्या युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी आज जाहीर केल्या. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयामध्ये नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आली.
नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे. स्मितल वाबळे – नगर तालुका, पारनेर व कर्जत, संदीप पुंड – राहुरी व कोपरगाव, राजू बोरुडे – राहता व श्रीरामपूर, देवेंद्र कडू पाटील – नेवासा व शेवगाव. उर्वरित तालुक्यांसाठीच्या नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार आहेत.
नवनियुक्त समन्वयकांची बैठक देखील यावेळी पार पडली. बैठकीत नवनियुक्त समन्वयकांना मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक किरण काळे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात युवक कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती युवक कार्यकर्ते काम करण्यासाठी पुढे येत आहेत.