विभागीय आयुक्तांचे सर्व विद्यापीठांना आदेश
पुणे – विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांबाबत विशेष काळजी घेऊन करोनाचा प्रादूर्भाव असणाऱ्या देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांना घरच्या घरीच विलगीकरण करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिले आहेत.
करोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक शनिवारी घेण्यात आली. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन खताळ, उपायुक्त प्रताप जाधव, उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, “करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वतःहून घरीच 14 दिवस स्वतंत्र राहावे, कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, अशा सूचना सर्वांपर्यंत पोहोचवा. परदेशातून आलेल्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा. मात्र, या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करुन आलेल्या परंतु खासगी ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, जेणेकरून त्यांची माहिती ठेवणे प्रशासनाला सोयीस्कर होईल.’
विद्यार्थ्यांनी समूहाने फिरू नये
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सगळीकडे फिरू नये, असे आवाहनसुद्धा डॉ. म्हैसकर यांनी केले आहे. अशा प्रकारे जर विद्यार्थी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण ही खबरदारी घेतली आहे, याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने घेतली पाहिजे. एकत्रितपणे बाहेर जाताना विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. त्यामुळे कोणी अडवल्यास अडचण होणार नाही, फिरताना सुद्धा एकमेकांमध्ये अंतर ठेवावे, असे विभागीय आयुक्त म्हणाले.