सातारा – वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीत बाजारामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळीत सातारकरांनी एसटी बसमधून प्रवासाला प्राधान्य दिल्याने, सातारा आगाराला 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल एक कोटी दोन लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याने महसूल वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
सातारा मध्यवर्ती आगाराने 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत विक्रमी महसूल मिळवला आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ तिकीटदरात 50 टक्के सवलत देणारी “महिला सन्मान योजना’ अशा सवलतींच्या अनेक योजना असूनही आगाराला चांगला महसूल मिळाला आहे.
या योजनांमुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभल्याने, दिवाळीत एक कोटी दोन लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. अपुऱ्या बसेस, मनुष्यबळाची कमतरता, यांत्रिकी विभागात सामग्री आणि सुविधांचा खडखडाट, अशी परिस्थिती असतानाही लालपरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. या अडचणींवर मात करत, यांत्रिक विभागातील कर्मचारी, चालक, वाहक आणि अन्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे महसुलाचा हा पल्ला गाठता आला आहे.
गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवल्याने सातारा आगाराच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात येत असल्याची प्रतिक्रिया सातारा आगार व्यवस्थापक रोहन पलंगे यांनी दिली. सातारा मध्यवर्ती आगाराला 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान महिला सन्मान योजनेतून 38 लाख, अमृत देश सन्मान योजनेतून 27 लाख 66 हजार आणि ज्येष्ठ नागरिक योजनेतून 12 लाख 75 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
सरकारकडून विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे आगाराला दोन कोटी 87 लाख रुपये मिळाले आहेत. आगामी काळात नव्या कोऱ्या 18 शिवशाही बसेस आगाराला मिळणार आहेत. सातारा-पुणे आणि सातारा-बोरिवली या विनाथांबा फेऱ्या सुसाट असून, या दोन्ही मार्गांवर आगाराला 18 लाख 66 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे