जिल्हा रुग्णालयातील करोना कक्षात उपचार सुरु
नाशिक : जगभरात करोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या भयंकर अशा करोनाचे रुग्ण भारतातही आढळले आहेत.
केरळमध्ये 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने भारतात देखिल खळबळ उडाली आहे. यातच आता नाशिकमध्ये देखिल करोना सदृश्य रुग्ण आढळला आहे. सध्या त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात करोना कक्षात उपचार सुरु आहेत.
मूळचा चंद्रपूरचा असणारा हा 24 वर्षीय तरुण इटलीमध्ये शिक्षण घेत असून तो काही दिवसांपूर्वी मायदेशी परतला आहे. यावेळी मुंबई विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी देखिल करण्यात आली होती. पण त्यावेळी तो निरोगी असल्याचे स्पष्ट झाले होते.
तीन दिवसांपूर्वी नाशिकला तो त्याच्या बहिणीकडे आला असता त्याला सर्दी आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर उपचारादरम्यान प्रथमदर्शनी करोनाचे लक्षणे निदर्शनास आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त होताच त्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत करोनाबाधित क्षेत्रातून आठ नागरिक दाखल झाले आहेत.