Nashik Lok Sabha Election| नाशिक लोकसभा मतदारसंघासाठीचा महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकची जागा अखेर शिंदे गटाला मिळाली असून येथून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांना लढण्याची इच्छा होती. मात्र पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. यानंतर आज हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ? Nashik Lok Sabha Election|
“हेमंत गोडसे सध्याचे विद्यमान खासदार असून अपेक्षेप्रमाणे आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. ही अतिशय आनंददायी बाब असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो, त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता, आतापासूनच त्यांच्या प्रचाराला सुरुवात होईल,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये आजपासूनच आम्ही पूर्ण ताकतीने प्रचार-प्रसाराला सुरुवात करणार आहोत. दिंडोरीच्या उमेदवार भारतीताई पवार आणि हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम देखील उद्या संपन्न होईल. याकरिता राज्याचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याकरता भव्य मिरवणुकीचे ही आयोजन करण्यात येईल. या मिरवणुकीमध्ये नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.
“सध्या वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे. दहा वर्ष ते खासदार होते. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सोपे जाईल. या पंधरा-सोळा दिवसात आम्ही पूर्ण ताकतीने त्यांचा प्रचार कर. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करून पाठवू,” असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
…तर काही ठिकाणी तडजोडही करावी लागते
भुजबळ समर्थक नाराज असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, “महायुतीचा भाग असताना काही ठिकाणी आपल्या अपेक्षा बाजूला ठेवून पक्षश्रेष्ठींचा निर्णय मानावा लागतो. तर काही ठिकाणी तडजोडही करावी लागते. संधी येतात, संधी जातात. मात्र, आपलं काम अविरतपणे सुरू ठेवलं पाहिजे,” असेही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा: