प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) शैक्षणिक वर्ष 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली आहे; परंतु या गुणवत्ता यादीत संस्थेतील काही अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागा भरलेल्या नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने आरक्षण लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अन्यायाविरोधात संस्थेसमोर निदर्शने केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर एफटीआयआयमधील प्रवेश प्रक्रिया काहीशी विलंबाने सुरू आहे. विविध अभ्यासक्रमातील 2021 या वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली.
टेलिव्हिजन आणि आर्ट ऍण्ड डिरेक्शन अशा काही अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादीत संस्थेने आरक्षण लागू असणाऱ्या संबंधित प्रवर्गातील जागा रिकाम्या ठेवल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्क डावलून आरक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. एफटीआयआयने आता जाहीर केलेली संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची गुणवत्ता यादी त्वरित स्थगित करावी. आरक्षण लागू असणाऱ्या आणि त्या-त्या प्रवर्गानुसार प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावासह नव्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनतर्फे करण्यात आली.