Election Results : देशातील पाच राज्यांमधील एकूण ६९० विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहेत. यासाठीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून पाचही राज्यांतील निकालांचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपने जोरदार आघाडी घेतल्याचं दिसत असून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. अनेक ‘एक्झिट पोल’मधून उत्तर प्रदेश व मणिपूर राज्यांमध्ये भाजपला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी फार कष्ट लागणार नाहीत असे भाकीत करण्यात आले होते. तर पंजाबमध्ये यंदा आम आदमी पक्षाचा झाडू काँग्रेसला साफ करेल असेही भाकीत नोंदवण्यात आलेलं. सुरुवातीचे कल पाहता गोवा व उत्तराखंडमध्ये देखील भाजपचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशात डबल इंजिन | Uttar Pradesh Election Results
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. यापैकी भाजपने २४३ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून त्यांच्याकडे १११ जागांची आघाडी आहे. काँग्रेस व बसपाकडे अनुक्रमे ६ व ५ जागांवर आघाडी आहे.
पंजाबमध्ये आपचा झाडू जोमात | Punjab Election Results
पंजाब : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची जादू पाहायला मिळत असून येथे ८८ जागांवर आघाडी आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला राज्यात केवळ १३ जागांवर आघाडी आहे. तर अकाली दलाला १० जागांवर आघाडी आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत.
गोव्यात भाजपला आघाडी | Goa Election Results
गोव्यातील विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी १८ जागांवर भाजपला आघाडी मिळाली असून काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाला येथे १ जागेवर आघाडी आहे. तृणमूल काँग्रेसला मात्र येथे अद्याप एकही जागेवर आघाडी नाही.
उत्तराखंडमध्ये भाजप सुसाट | Uttarakhand Election Results
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागा असून येथे भाजपला ४५ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस २१ जागांवर पुढे आहे.
मणिपूरमध्ये देखील कमळ आघाडीवर | Manipur Election Results
मणिपूरमध्ये भाजपला २४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस येथे दुसऱ्या स्थानावर असून ते ५ जागांवर पुढे आहेत.