बेलग्रेड (सर्बिया) – सर्बियामध्ये अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून मोठे आंदोलन उभे राहिले आहे. सोमवारी प्रक्षोभक आंदोलन करण्याच्याआरोपाखाली किमान ३८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय आणि स्थानिक निवडणुकांमध्ये सत्तारुढ सरकारने विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतो आहे.
रविवारी हजारो आंदोलकांनी बेलग्रेडच्या महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खिडक्यांच्या काचा फोडल्या गेल्या. मात्र पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि लाठीमार करून आंदोलकांना पिटाळून लावले.
रविवारच्या हिंसक आंदोलनानंतर सोमवारीही अदिक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांच्यावतीने देण्यात आला होता. आंदोलकांना बेलग्रेडमदध्ये हिंसाचार करू दिला जाणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी बेलग्रेडमधील रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
सर्बियामधील सत्तारुढ सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीने निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळला आहे. विदेशी आणि देशांतर्गत निरीक्षकांंनी टीका केली असली तरी या निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्याचे या पक्षाने म्हटले आहे.
रविवारचे आंदोलन म्हणजे परदेशातून मदत घेऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न होता, असे सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी म्हटले आहे. मात्र परदेशातील मदत म्हणजे कोणत्या देशाची मदत हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
वुकिक यांच्या पक्षाने संसदीय आणि बेलग्रेड शहर महापासिका या दोन्ही निवडणुकांमध्ये विजयाचा दावा केला. मात्र मतपेट्यांची आदलाबदलीसारख्या काही गैरप्रकारांचा आरोप देशांतर्गत आणि विदेशी निरीक्षकांनीही केला आहे.
सर्बिया प्रथमपासूनच रशियाचा मित्र
सर्बियाला युरोपीय संघामध्ये प्रवेश हवा आहे. मात्र सर्बिया प्रथमपासूनच रशियाचा मित्र देश राहिला आहे. /क्रानवर आक्रमण केल्याबद्दल युरोपीय संघाने जेंव्हा रशियावर निर्बंध घातली होती, तेंव्हा सर्बियाने त्याला विरोध केला होता. रशियाधार्जिण्या धोरणांमुळेच वुकिक यांच्या सरकारला देशातूनच मोठा विरोध होतो आहे.