पुणे – सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी ससून रूग्णालयात स्पेशल फ्लू ओपीडी सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार (दि. 20) पासून ससून रुग्णालयातील नवीन अकरा मजली इमारत याठिकाणी बाह्यरूग्ण विभाग क्रमांक 100 येथे ही ओपीडी असणार आहे. त्याठिकाणी व्यक्तीची तपासणी आणि उपचार दिले जाणार आहे. तसेच त्यामध्ये कोणी करोना संशयीत व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ नायडू रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.
सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असलेला प्रत्येक व्यक्ती करोनाबाधित आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. तर एकाही चुकीमुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ससून रुग्णालयात स्पेशल फ्लू ओपीडी सुरू केली आहे. ही ओपीडी सकाळी 9 ते 12 या वेळेत असेल.
ज्या रुग्णांना फक्त घसादुखी, ताप, सर्दी, खोकला इ. लक्षणे असतील त्यांना येथे तपासणी, निदान व उपचार घेता येतील. रुग्णांची नोंदणी केसपेपर, तपासणी, औषधे, समुपदेशन या सर्व सुविधा एका छताखाली देण्यात येणार आहेत. या ओपीडीत तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका, फार्मासिस्ट व समुपदेशक यांचा समावेश आहे.