पुणे – ससून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाला उंदराने चावा घेतला. या प्रकरणी सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच २३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक यांचा पदभार काढून, नवीन अधीक्षकाची नियुक्ती करण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. उंदीर चावल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच ससून रूग्णालयात उघडकीस आली. त्याबाबत नातेवाईकांनी केलेले आरोपावर ससून रूग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला नाही. शवविच्छेदन अहवालातही मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू ओढावल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.
“चौकशी समितीने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार अधिष्ठातांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली. वैद्यकीय अधिक्षकांचा पदभार काढून त्या जागी नवीन अधिक्षक नियुक्त करावा सूचना आयुक्तांनी शुक्रवारी रात्री दिल्या आहेत.” – डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग