शिवसेनेला दुटप्पीपणाची किंमत भविष्यात मोजावी लागेल -प्रवीण दरेकर

मुंबई: कोकण आणि गणपती याचे अनोखे समीकरण आहे. दरवर्षी गणपती आणि गौरीसाठी चाकरमाने कोकणात जातात. मात्र यंदा कोरोनाने गणपतीच्या उत्सवावरही पाणी फेरले आहे. त्यातच आता कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रशासनाने अनेक नियम आखून दिले आहेत. यावरूनच सध्या राजकारण रंगले असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या गणेशोत्सवाबाबतच्या दुटप्पी भूमिकेमुळे कोकणी जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भविष्यात त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, कोकणात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे एसटी बसेसची सुविधा करण्यात आलेली नाही. यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. राज्य सरकार कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही असे सांगत असले तरी स्थानिक नेत्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गरज असेल तरच गणपतीसाठी कोकणात या, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. विनायक राऊत यांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. ज्या कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेने राजकीय यश मिळवले. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढवली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला आता शिवसेना पायदळी तुडवत आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.