शिरूर -येथील न्हावरा फाटा येथे दुधाला प्रति लिटर 30 रुपये बाजारभाव, दहा रुपये अनुदान व दूध पावडर निर्यातीला 50 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शनिवारी (दि. 1) आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिरूर तालुका भाजप व भाजप महिला मोर्चा यांच्यावतीने शिरूर राष्ट्रीय महामार्ग कानिफनाथ फाटा (न्हावरा फाटा) येथे हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलनास माजी आमदार बाबूराव पाचर्णे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब सरोदे, भाजप तालुका उपाध्यक्ष शामकांत वर्पे, राजेंद्र चव्हाण, अशोक शेळके, गोरक्ष काळे, संचालक संतोष मोरे, कैलास सोनवणे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.