पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर आयुक्तांची कारवाई
बेशिस्त व पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे वर्तन
पुणे – बेकायदेशीरपणे फॉर्च्युनर गाडी ताब्यात ठेवून तपासादरम्यान जप्त केलेले 28 लाख रुपये न दाखविणे व गुन्ह्याच्या तपासात संशयास्पद व बेशिस्त वर्तन केल्यामुळे एक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक अशा दोघांची 2 वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली. बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याप्रकरणी तिघांवर ही कारवाई केली.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात तपासात कसुरी केल्याबद्दल तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर यांना पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ही शिक्षा सुनावली.
2018 मधील या प्रकरणात सहायक निरीक्षक रायकर यांनी 5 महिन्यांत काहीही तपास केल्याचे दिसून आले नाही. आरोपी व्यंकटेश याच्या म्हणण्यानुसार त्याने रायकर यांना रिकव्हरीत 28 लाख रुपये दिले. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार व्यंकटेश व त्याची पत्नी ममता यांच्याकडून 30 ते 40 लाख रुपये रिकव्हरी म्हणून जमा झाले. मात्र, रायकर व श्रीकांत शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी कोणतीही रिकव्हरी झाली नसल्याचे सांगितले. तसेच, व्यंकटेशच्या पत्नीने गुन्ह्यात रिकव्हरीकरिता फॉर्च्युनर गाडी रायकर यांच्या ताब्यात दिली होती. ही गाडी 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता आरोपीस परत न देता पुणे येथे ठेवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. त्यावरून रायकर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गाडीविषयी अनभिज्ञ आहोत, असे दाखवत आहेत.बंगळुरू येथे तपासाला जाऊनही त्याबाबत गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये अथवा वरिष्ठांना कोणताही अहवाल सादर केला नाही.
श्रीकांत शिंदे यांना गुन्ह्याचे कागदपत्रे तपासणीदरम्यान संपर्क करून हजर राहण्याबाबत सहायक पोलीस आयुक्तांनी सूचित केले असताना ते एकदाही हजर झाले नाहीत. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासावरील त्यांचे पर्यवेक्षण नसल्याचे दिसून येते. श्रीकांत शिंदे व रायकर यांची सचोटी संशयास्पद दिसून येत असून त्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे खटल्यात आरोपीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांना वरील शिक्षा दिली.
डेक्कन पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळणेकामी मदत करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून एजंटशी संगनमत करून 1 लाख रुपये स्वीकारल्याचे ऑडिओ रेकॉडिंग अर्जदाराने सादर केले आहे.
“बाई वाड्यावर या’ म्हणणे महागात
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना “वाड्यावरती भेटायला या’ असा शब्दप्रयोग करणाऱ्या राखीव पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली. अशोक टोके असे त्यांचे नाव आहे. टोके यांची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार या तक्रार अर्जांची सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी करून अहवाल अपर पोलीस आयुक्तांना सादर केला. त्यानुसार टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागितला होता. मात्र, तो समाधानकारक वाटला नाही. वाडा हा शब्दप्रयोग महिलांच्या बाबतीत करणे उचित नसून अहवालामध्ये टोके यांची कसुरी निष्पन्न झाली आहे.