मुंबई : नागपूरमध्ये महापौरांवर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळीत गुरूवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव हे गुरूवारी सकाळी मुलासह साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. याचवेळी एकानं त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी शेखर जाधव यांना लागली. या गोळीबारात जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या नागरिकाला पकडून ठेवले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पिस्तुल जप्त करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू केली आहे.
शेखर जाधव यांना तीन महिन्यांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे. विक्रोळीत शिवसेनेचे प्रस्थ असून, गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूरच्या महापौरांच्या वाहनावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून वाचले. वाहनामधील कोणालाही दुखापत झाली नाही. महापौर संदीप जोशी यांना दिवसांपासून धमक्या देखील येत होत्या. या घटनेपाठोपाठ मुंबईत गोळीबाराची घटना घडली आहे.