बॉलीवूडधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्मातेसंजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई या चित्रपटानंतर बैजू बावरा चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. आता या चित्रपटातील स्टारकास्टबाबतच्या बातम्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यानुसार या चित्रपटात बैजूबावराची व्यक्तिरेखा रणवीर सिंह साकारणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटात अजय देवगण तानसेनाच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील काळात रणवीर आणि संजय लीला भन्साळी या जोडगोळीने रुपेरी पडद्यावर बरीच धूम उडवून दिलेली आहे.
आता या आगामी चित्रपटात भन्साळी आपल्या आवडत्या कलाकाराबरोबरच नव्हे तर लाडक्या जोडीसह काम करणार आहेत. या चित्रपटात रणवीरसिंहसोबत नायिका म्हणून दीपिका पदुकोणच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दीपिका आणि रणवीर 83 या चित्रपटातही एकत्र झळकणार आहेत. सध्या भन्साळींचे सर्व लक्ष गंगूबाई चित्रपटावर आहे.
या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गंगूबाईपूर्वी भन्साळींच्या इन्शाल्लाह या चित्रपटाची बरीच चर्चा होती. या चित्रपटात सलमान खानला घेण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. पण काही कारणांमुळे हा चित्रपटच सध्या गुंडाळून ठेवण्यात आला आहे. आता गंगूबाई आणि बैजू बावरा या चित्रपटांना प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतात ते पाहायचे!