राज्यभरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आले आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी येणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील मंत्रीही हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे बिकेसी इथे शिवसेना जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत महाविकासआघाडी करत सत्तास्थापन केली आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळाला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर भव्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवसैनिकांकडून करण्यात आलं आहे.