Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची अजूनही घोषणा केलेली नाही. ही जागा अजित पवार गटाला की शिंदे गटाला याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम होता. मात्र मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मी येथून लोकसभा लढवणार नसल्याचे सांगितल्याने ही जागा शिंदे गटाला निश्चित झाली. तरीही उमेदवार कोण असणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे यांचे विविध पदाधिकारी मुंबई तळ ठोकून होते. या पदाधिकाऱ्यांची आज पहाटे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. यावेळी उमेदवारीच्या घोषणेला विलंब होत असल्याची कार्यकर्त्यांत अस्वस्थता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला संमती दिली असून त्यांना प्रचाराला सुरुवात करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाने आता निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
दरम्यान, नाशिक मध्ये आता महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांच्यात थेट लढत होणार आहे. गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे तर वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असल्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.