सहाशे झाडांची गणती : ग्रामपंचायतींना कडक सूचना
निमसाखर -महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसह अन्य योजनांमधून निमसाखर परिसरात लावलेल्या वेगवेगळ्या झाडांना टॅगिंग केले जात आहे. या टॅगिंगमध्ये झाडाचे नाव, नंबर टाकून गणना केली जात आहे. त्यामुळे निमसाखर परिसरात झाडांची संख्या कळणार आहे. तसेच वृक्षतोडीला आळा बसणार आहे.
निमसाखर हे गाव साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाला गावठाण, गायरान क्षेत्र मोठे आहे. अशा ठिकाणी गेली वर्षापूर्वी प्राथमिक शाळा, सातलिंब परिसर व नदीकाठचे किंडागण, स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात माजी सरपंच गोविंद रणवरे यांच्या प्रयत्नातून वृक्ष लागवड केली गेली. यामध्ये लिंब, चिंच, करंज, जांभूळ, बांबूची झाडांसह फळ देणारी, आयुर्वेदामध्ये महत्व असणारी तर अनेक झाडे ही सावली देणारी आहेत.
याठिकाणी या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहेत. या झाडांच्या संगोपणासाठी दोनशे झाडामागे 1 असे परिसरात 1 हजार झाडांमागे 5 मजूर या ठिकाणी काळजी घेत आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार योजनेमध्ये लागवड झालेल्या प्रत्येक झाडाला माहिती टाकलेला हा टॅग लावण्यात आला आहे. टॅग लावण्यासाठी मजूर संगोपनाचे काम करीत आहेत. आत्तापर्यंत सहाशे झाडांना टॅग लावण्याचे काम झाले आहे.
इंदापूर तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतींना मोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या झाडांची पंचायत समितीमध्ये कोणत्या गावात, कोणत्या योजनांच्या माध्यमातून लावलेल्या झाडांची जातीनिहाय नोंद असणे जरुरीचे आहे. या नोंदीची अपडेट न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कडक सूचना दिल्याचे इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.