शिरूर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचे वाढते संकट आणि घराची ओढ लागलेले परप्रांतीय मजूर भीती आणि दहशत छातीशी कवटाळून हजारो किलोमीटरचा प्रवास करत पायी स्वगृही निघाले होते. मात्र, अशावेळी त्याच्या मदतीस महाराष्ट्राची एसटी बस म्हणजेच लालपरी मदतीस धावली आणि पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय नागरिकांना कवेत घेऊन त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे.
हॉटस्पॉट मधील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या लाल परीच्या चालक-कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता वेळप्रसंगी शेकडो किलोमीटर एसटी बस चालवत आणि भूकही विसरत मजूरांना त्याच्या स्वगृही करण्याचे कार्य पार पाडले. एसटी बसच्या चालकांचे हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.
मध्यप्रदेश ८८ एस टी बस, छत्तीसगड येथे 93 अशा मिळून 181 एस टी बस व 362 बस चालक यांनी हा मध्यप्रदेश सीमेपर्यंत आकरली गावापर्यंत पावणे चारशे किलोमीटर तर छत्तीसगड सीमा देवरी जवळपास सव्वा आठशे किलोमीटरचे अंतर पार करत या परप्रांतीय नागरिकांना सोडवण्याचे काम एसटी बस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गेल्या सात दिवसापासून 10 मे पासून आज पर्यंत त् एसटी बस चालक व एसटी बस कर्मचारी हे काम करीत असून गाडी येथून निघणे अगोदर गाडीचे निर्जंतुकीकरण व ज्या ठिकाणी पोहोचते त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षितेसाठी मस्क पुरवण्यात येत आहे.
“शिरूर येथून आजपर्यंत या दोन्ही राज्यात परप्रांतीय नागरिकांना सोडवण्याचे काम गेली सात दिवसापासून सुरू आहे. शिरूर एसटी बस चालक यांच्याकडून गेली सात दिवस 4571 परप्रांतीय मजुरांना सोडवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यासाठी शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसिलदार लैला शेख यांच्या सहकार्यातून सुरू आहे. -महेंद्र माघाडे, शिरूर एस टी बस स्थानक प्रमुख