पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा निवडणुकीतून सात उमेदवारांनी तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून तीन उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता पुणे मतदारसंघातून 35, तर शिरुर मतदारसंघातून 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांसाठी दि.13 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि.4 जून 2024 रोजी होणार आहे.
पुणे, शिरुर या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 18 एप्रिलपासून सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि.25 एप्रिलपर्यंत होती. पुणे मतदारसंघातून एकूण 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 उमेदवारांनी अर्ज भरले होते. शुक्रवारी (दि.26) दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये पुणे मतदारसंघातील 42 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर, शिरुर मध्ये 11 अर्ज बाद झाले. त्यामुळे 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवारी दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.